दिवाळी सोहळा

कार म्युझियम

कोजागिरी पौर्णिमा दांडिया

गणेशोत्सव- २०१७

महाराष्ट्र दिन आणि 'भैरव ते भैरवी" कार्यक्रम

नमस्कार, महाराष्ट्र मंडळाचा महाराष्ट्र दिनाचा कालचा कार्यक्रम म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. अतिशय दर्जेदार कलाकारांनी एकत्र येउन 'भैरव ते भैरवी' हा एक उत्कृष्ठ कार्यक्रम सादर केला. महाराष्ट्र मंडळासाठी अल मुल्ला एक्स्चेंज ने प्रायोजित केलेला हा सलग सातवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. दिवस - रात्रीचा , निसर्ग चक्राचा शास्त्रीय संगीतातल्या रागांशी असलेला संबंध आणि आयुष्याचा प्रवास याची उत्तम सांगड घालत भैरवापासून सुरु झालेला हा प्रवास प्रत्येक वळणाचा आस्वाद घेत शेवटच्या भैरवीवर येउन विसावला. खूप काही शिकवून गेला हा प्रवास.… मुक्त स्वच्छंदी आस्वाद घ्यायला … अंतर्मुख व्हायला … कुठल्याही विचारांच्या चौकटीत न अडकता थेट मनाला भिडणाऱ्या स्वरांचा आनंद उपभोगायला !! श्रोत्यांच्या नकळत शास्त्रीय संगीताचे सूर बंदिश, भावगीत, नाट्यगीत, भजन, गझल, भक्तीगीतांच्या सोनेरी वेष्ठणात इतक्या नजाकतीने बांधून सादर केले गेले की तीन- साडेतीन तास सर्व मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिले. "तेजोनिधी लोह गोल, भास्कर हे गगन राज" अशी सुरुवात करणाऱ्या पंडित विजय कोपरकर यांनी मारवा, भीमपलास, बागेश्री, यमन, तोडीच्या सुरांचा अक्षरशः पाणलोट काढला …. आणि आम्हा श्रोत्यांच्या मनाच्या गगनावर आपले राज्य प्रस्थापित केले. अतिशय साध्या सरळ सुरांनी मनाला अशी भुरळ घातली कि शास्त्रीय संगीतातल्या बंदिशिंनाही once more ऐकावेसे वाटले. त्यांची आयुष्यभराची साधना, तपःश्चर्या त्यांच्या गायकीतून प्रकट होत होती. सायली पानसे आणि दत्तप्रसाद रानडे यांनी उपशास्त्रीय आणि सुगम संगीताची बाजू सांभाळली. सायली पानसे यांचेही सुरांवरचे प्रभुत्व ठायी ठायी जाणवत होते. अतिशय ताकदीच्या या गायिकेने काल यमन, कलावती अक्षरशः जिवंत केले. 'छुपालो यूँ दिल में प्यार मेरा' म्हणताना सुरातली विनवणी भावली. दत्तप्रसाद रानडे यांनी भजन आणि सिनेमातील गीतांसोबतच उत्तम गझल सदर केल्या. गझल गायकीतलं त्याचं नैपुण्य आणि पकड नेमकी जाणवत होती. रसिकांनी त्यांच्या गायनाला भरभरून दाद दिली … onece more दिला. "अब तक दिल-ए-खुश फहाम को है तुझसे उम्मीदें, ये आखरी शम्में भी बुझाने के लिए आ। .... रंजिशें ही सही। " आणि मारवा रागावर आधारित "कोई दर, कोई दरीचा, कोई सायबा नहीं है। किसी दिलजले का घर है ये मेरा मकाँ नहीं हैं। " …. म्हणजे केवळ अप्रतीम ! व्हॉयलिन वर श्री राजेंद्र भावे यांनी कमाल केली. तबल्यावर श्री. प्रसाद जोशी आणि key board वर निनाद सोलापुरकर यांनी उत्तम साथ दिली तर उत्तम संगीत संयोजनाने श्री. आशिष मुजुमदार यांनी वाहवा मिळवली. आपल्या ओघवत्या शैलीत श्री. अमित वझे यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्र संचालन केले. एक वेगळा आणि दर्जेदार कार्यक्रम देण्याचा समितीचा प्रयत्न आपल्या पसंतीस उतरला याचा आम्हाला खूप आनंद आहे. आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम वेळेत सुरु झाला व शिस्तीत पार पडला. आयोजनात काही त्रुटी राहून गेल्या असल्यास क्षमस्व. धन्यवाद !! कार्यकारी समिती २०१५ महाराष्ट्र मंडळ, कुवेत रुजवू मराठी फुलवू मराठी...

Newsletter

Contact us

You are here: Home News महाराष्ट्र दिन आणि 'भैरव ते भैरवी" कार्यक्रम